satyaupasak

छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या प्रस्तावाला केला होता विरोध – नारायण राणे यांचा गौप्यस्फोट

छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या प्रस्तावाला केला होता विरोध – नारायण राणे यांचा गौप्यस्फोट

आम्ही कोणत्याही समाजाचे आरक्षण काढून घेत नाही. घटनेच्या कलम १४ (४) आणि १५ (४) नुसार नियमानुसार मागासवर्ग म्हणून आरक्षण मिळावे. १६ टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव होता. भुजबळ यांनी समजावून सांगितले. त्यानंतर प्रस्ताव तयार झाला, असा किस्सा नारायण राणे यांनी उलगडला.

मराठा आरक्षणास आपला विरोध नाही. मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून नव्हे, तर स्वतंत्र आरक्षण द्यावे, असा दावा ओबीसी नेते छगन भुजबळ करतात. परंतु प्रत्यक्षात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा आरक्षणाचा प्रस्ताव आला तेव्हा छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणास विरोध केला होता, असा गौप्यस्फोट खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला. मराठा समाजाच्या महासंमेलनात बोलताना नारायण राणे यांनी ही माहिती दिली. त्यामुळे आता छगन भुजबळ यांच्यासमोर नवी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.

महासंमेलनात बोलताना नारायण राणे म्हणाले की, मराठा समाजाने आपण नेमके कुठे उभे आहोत, याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. मराठा समाजाची लोकसंख्या ३० टक्के आहे, परंतु आयएएस, आयपीएसमध्ये केवळ १५ टक्केच युवक आहेत. दारिद्र्यरेषेखाली असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या २२ टक्के आहे. शेतीपासून राजकारणात समाज कुठे आहे, याचा विचार करायला हवा, असे राणे यांनी स्पष्ट केले.

भुजबळ यांचा दावा ठरवला फोल
मराठा आरक्षणासंबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळात आला, त्यावेळी काय घडले ते नारायण राणे यांनी सांगितले. मराठा आरक्षणासाठी समिती नेमली होती आणि त्याचे अध्यक्ष मला केले होते. मराठ्यांना आरक्षण देणे ही माझी भूमिका होती. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मला फोन करून सांगितले की, उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे, परंतु या बैठकीत मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मांडू नये, असे भुजबळ साहेबांचे पत्र आल्याचे त्यांनी कळवले.

भुजबळ यांना फोन करून मी त्यांना विनंती केली आणि समजावून सांगितले की, आम्ही कोणत्याही समाजाचे आरक्षण काढत नाही. घटनेच्या कलम १४ (४) आणि १५ (४) नुसार नियमानुसार मागासवर्ग म्हणून आरक्षण मिळावे, १६ टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव होता. त्यानंतर भुजबळ यांनी समजावून घेतले आणि प्रस्ताव मंजूर झाला.

त्यावेळी कोणीही या विषयावर बोलण्यास तयार नव्हते, परंतु मी हा विषय रेटून नेला आणि तो मंजूर करवला, असे राणे यांनी स्पष्ट केले. त्यांनी मराठा समाजाला उद्योगाकडे लक्ष केंद्रित करण्याचे आवाहनही केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श अंगीकारण्याचे आवाहन केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *